छोटे इंजिनिअर प्रकल्प स्पर्धा-२
सलग दुसऱ्या वर्षी भागातील एकूण ५ शाळांमधील ४०५ विद्यार्थ्यांची प्रकल्प स्पर्धा १२ फेब्रुवारी २०२५ रोजी अतिशय उत्साहात घेतली गेली. वेगवेगळ्या समस्यांवर कल्पनाशक्ती वापरून प्रत्यक्ष प्रतिकृती बनवणे...
ज्ञान प्रबोधिनी शिवापूर - कौशल्य प्रशिक्षण केंद्र
छोटे इंजिनिअर प्रकल्प स्पर्धा - १२ फेब्रुवारी २०२५
छोटे इंजिनिअर या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष! मागच्या वर्षी दोन शाळांमध्ये आणि या वर्षी अजून तीन म्हणजे एकूण मिळून पाच शाळांमध्ये हा उपक्रम वर्षभर सुरु आहे. इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा तंत्रशिक्षण विषयातील प्रकल्प आपण घेत आहोत. एकूण मिळून ४०५ विद्यार्थ्यांपर्यंत आपण या निमित्ताने पोहोचलो आहोत. एकूण मिळून डिसेंबर महिन्यापर्यंत प्रत्येक शाळेत ३० सत्र आपल्या अध्यापकांनी घेतली आहेत. या सत्रांमध्येही जास्ती भर हा प्रत्यक्ष कृतीतून शिकण्यावर दिला जातो.
या वर्षभर सुरु असलेल्या नियमित सत्रांमधून विद्यार्थ्यांमध्ये काय बदल होतात असे बघण्यासाठी ही प्रकल्प स्पर्धा आयोजित केली जाते. ही स्पर्धा एकूण महिनाभर चालते. यामध्ये सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या गटाला काही समस्या विधाने दिली जातात. त्यातून एक समस्या विद्यार्थी निवडतात व गटामध्ये त्याच्यावर उत्तर काढण्याचा प्रयत्न करतात.
यावर्षी माळेगाव, कुसगाव, डोणजे, कोंढ़णपुर व कल्याण येथील शाळांमधील इयत्ता 8 वी व 9 वी चे एकूण ४०५ विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. सर्वांनी आपापले गट बनवले व आपापल्या समस्या विधानाबाबतच्या उत्तरांचे सादरीकरण आपापल्या शाळेतच केले. शिवापूर कौशल्य प्रशिक्षण केंद्रामधून हे सादरीकरण बघायला व त्यामधून अंतिम फेरीसाठी गटांची निवड करण्यासाठी प्रशिक्षक प्रत्येक शाळेमध्ये गेले होते. या सर्व गटांमधून एकूण २८ गट म्हणजे एकूण ११७ विद्यार्थी अंतिम फेरीसाठी शिवापूर केंद्रामध्ये १२ फेब्रुवारी रोजी जमले.
१२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० पासून ते सायंकाळी ५.१५ पर्यंत प्रकल्प स्पर्धा राबविली गेली. या २८ गटांना त्यांना लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. प्रत्येक गटाने त्यांना वाटणाऱ्या उत्तराची प्रत्यक्ष चालणारी प्रतिकृती ४ तासांमध्ये तयार केली. ही प्रतिकृती तयार करण्यासाठी गटांनी वेगवेगळी यंत्रे, उपकरणे स्वतः वापरली, स्वतः त्याची तपसणी केली व याचा प्रकल्प-आराखडाही भरला. प्रत्येक गटाबरोबर प्रशिक्षण केंद्रामधील विद्यार्थी त्यांना मदत करण्यासाठी व केंद्रातील अध्यापक आणि प्रबोधिनीचे काही या क्षेत्रात कार्यरत असणारे माजी विद्यार्थी काही एकत्रित गटांना मिळून अधिमित्र म्हणून काम बघत होते.
दुपारी ३ वाजल्यापासून गटांचे परीक्षण सुरु झाले. अभियांत्रिकी क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती जसे की मोठ्या कंपनीमधील तांत्रिक भागाचे सल्लागार, अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक गटांचे परीक्षण करण्यास आल्या होत्या. गटांनी लिहिलेले प्रकल्प आराखडे बघणे, त्यांच्याकडून प्रकल्प समजून घेणे व प्रकल्प प्रत्यक्ष चालवून बघणे असे परीक्षणाचे स्वरूप होते. स्पर्धेमध्ये आपण एकूण ३ बक्षिसे देणार होतो परंतु सर्व परीक्षणांच्या एकमताने आपण अजून ३ उत्तेजनार्थ बक्षिसेसुद्धा दिली. सर्वच गटांनी स्वतः प्रकल्पास लागणारे काम केलेले असल्याने प्रत्येक गटाला प्रकल्पाचा चांगलाच आवाका होता.
दुपारी ४.१५ वाजता सभेचा कार्यक्रम सुरु झाला. सुरुवातीला विज्ञान गीत म्हणून सभेची सुरुवात झाली. या उपक्रमाचे वर्षभराचे अनुभव व स्पर्धेच्या तयाऱ्या याबाबत या उपक्रमाचे प्रमुख श्री. अभिजित सर बोलले. छोटे इंजिनिअर ते मोठे इंजिनिअर असा प्रवास कसा जाणीवपूर्वक केला पाहिजे व विद्यार्थ्यांची या निमित्ताने कशी उत्तम सुरुवात झाली आहे शिवाय तंत्रशिक्षणाच्या महत्वाबाबत मितेश दादा सर्वांशी बोलले. कार्यक्रमाला प्रमुख म्हणून Aask Precision Engineering कंपनीचे मुख्य श्री.अमित वेलणकर आले होते. त्यांच्याबरोबर ज्ञान प्रबोधिनीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. सुभाषराव देशपांडे व श्री. यशवंतराव लिमये, या उपक्रमाचे मार्गदर्शक श्री. सुरेंद्र वैद्य व मुख्य परीक्षक श्री. अमर दादा परांजपे व श्री. किरण दादा कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ओंकार दादा बाणाईत यांनी केले. अमर दादांनी परीक्षणाबाबत सर्वांना माहिती दिली व सर्व गटांचे कौतुक केले. एकूण ६ बक्षिसे देण्यात आली.
प्रथम बक्षीस हे विजय मुकुंद आठवले माध्यमिक विद्यालय या माळेगावमधील शाळेतील गटाला मिळाला. त्यांनी खूप वर्षांपासून शिक्षकांच्या खडू व डस्टर च्या समस्येवर अतिशय कल्पनापुर्वक उत्तर काढून प्रतिकृती बनवली होती. दुसरे बक्षीस विद्यानिकेतन विद्यालय, डोणजे या शाळेतील गटाला त्यांच्या पुस्तके ठेवण्याच्या मांडणीच्या उत्तरामुळे मिळाले. तृतीय बक्षीस हे शिवभूमी विद्यालय, कोंढणपूर मधील शाळेतील गटाला त्यांच्या फक्की मारायच्या सोप्या पण अतिशय कल्पक प्रतीकृतीमुळे मिळाले. उत्तेजनार्थ बक्षिसे डोणजे, कुसगाव व कल्याण मधील गटांना मिळाली त्यांनी अनुक्रमे ड्रीप इरिगेशन, पायऱ्यांना सुरक्षात्मक रचना व मोठा पाण्याचा पाईप व्यवस्थित गुंडाळण्याची समस्या यावर प्रतिकृती सदर केली.
सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांची मनोगते सभेच्या कार्यक्रमात मांडली. वर्षभरापासून सुरु असलेल्या या नवीन अभ्यासक्रमाबाबत सर्वांनीच त्यांचा आनद व्यक्त केला व स्पर्धेबाबात त्यांचे अनुभव सांगितले. स्पर्धेस या शाळांमधील शिक्षकही आवर्जून उपस्थित होते. त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांमधील नवीन गुण आज बघता आले असे सर्वांचेच भाव ठरले. मान्यवरांच्या मार्गदर्शनाने व मा सुभाषरावांच्या मार्गदर्शनाने सभेची सांगता झाली. काही गटांनी आपापल्या प्रतिकृती प्रत्यक्ष शाळेत वापरण्यास नेल्या.

कौशल्य प्रशिक्षण केंद्र, शिवापूर
Near Shivapur Wada, Khed-Shivapur, Haweli, Pune - 401102
नमस्कार! अतिशय उत्तम प्रकल्प आणि कार्यवाही...'काम' हे शिक्षणाचे माध्यम या संकल्पनेचा उत्तम नमुना या निमित्ताने प्रत्यक्षात आणला गेला... सर्व विद्यार्थी, शिक्षक, मार्गदर्शक व उपक्रम संघाचे विशेष अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!